छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.७) आमखास मैदान परिसरातून मॅफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली. शेख आफताब शेख सलीम (१९, रा. भाईवाडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ड्रग्ज, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आमखास मैदान परिसरातील भिंतीजवळ ड्रग्ज विक्री करण्यासाठी तरुण आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. सापळा रचून शेख आफताब शेख सलीम यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून २० ग्रॅमचे एमडी, मोबाईल असा सुमारे ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे ड्रग्ज त्याला शेख इराफ शेख अरशद (रा. अबरार कॉलनी), इरफान रा. भिवंडी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांनी पुरविले असल्याचे त्याने सांगितल्याने गुन्हे शाखेतील पोउपनि वाघ यांच्या पथकाने शेख इराफ शेख अरशद (रा.अबरार कॉलनी) यास ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध एनडीपीए कायद्यान्वये बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहा. पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, पोउपनि प्रवीण वाघ, शिंदे, नवसारे, निकम, सोनटक्के, छाया लांडगे यांच्या पथकाने केली.












